Friday 17 March 2017

17-06-2014

रस्त्यावर,तळपत्या उन्हात,शिळ्या पावाचे तुकडे मोडत,चालून बघा कधीतरी उघड्या पायांनी ,फिरून बघा कधीतरी उघड्या अंगानी...बसतील मग नाजूक पायांना चटके,उघड्या पाठीवर उन्हाचे फटके…जाणवतील मग त्यांच्या वेदना,त्यांचा त्रास,त्यांचा राग… समोरची air conditioned गाडी बघून वाटेल मग मत्सर,भिक मागण्यासाठी हात पुढे करताना उन्हापेक्षा लाजेनेच काळवंडून जाईल चर्या,समोरच्याने केलेलं जाणीवपूर्वक दुर्लक्ष पाहून शरम वाटेल स्वतःची,स्वतःच्या शरीराची,स्वतःच्या अस्तित्वाची…निघून जावसं वाटेल तडक…
पण भुकेची आग काहीच करू देणार नाही.पुन्हा भिक मागायला हात वर करताना विस्कटला जाईल स्वाभिमान आणि पुन्हा हिणवल्यावर संपून जाईल अभिमान उरला-सुरला...पुन्हा हात उचलताना जड होईल शरीर,चेहरा आक्रसून जाईल,उरली-सुरली लाज हातातून निसटून जाईल...
तितक्यात कोणीतरी गाडीतून उतरेल,उगाचच पाकीट काढून पैसे मोजेल,गॉगल लावून इकडे-तिकडे बघत दिमाख करेल,हातातलं भारीतल घड्याळ बघत कुणाचीतरी वाट पाहील.मग येतील त्याच्या मैत्रिणी-'त्यांच्यासारख्याच' उघड्या अंगांनी!पण त्यांच्या उघड्या अंगात त्याला दिसेल सौंदर्य.उन्हामध्ये उजळून निघेल त्या प्रत्येकीची कांती...आणि तुमचं उघडं शरीर मात्र जळत राहील त्याच उन्हात...शरीर आणि मनही...पुन्हा एकदा राग आवरून तुम्ही तुमचे हात पसराल,५-१० रुपयांसाठी स्वतःचं अस्तित्व विकत द्याल!
पुन्हा तुच्छ नजरेनी पाहील कोणीतरी आणि म्हणेल कुत्सित हसत-"चल,निघ इथून!...चोर असतात साले,धंदा असतो यांचा!"
जळफळ होईल आत,आगीचा डोंब उसळेल डोक्यात-"हो,आहे मी चोर...चोरी करतो दिवसा-ढवळ्या तुम्ही फेकून दिलेल्या पावाची...आहे हाच माझा धंदा...भूक हेच माझा भांडवल,जे कितीही वापरलं तरी संपतच नाही...बोली लावतो स्वतःच्या निर्लज्जपणाची आणि विकत घेतो तुमची दया- तुमची भिक!
पण हे सगळं बोलण्यासाठी अंगात त्राण असेलच कुठे?मुकाट्याने अपमान सहन करत निघून जाल तिथून-अगदी 'त्यांच्यासारखेच'-खालच्या मानेने,चुपचाप,दुसऱ्या कोणापुढे तरी हात पसरायला...
रस्त्यावर,तळपत्या उन्हात,शिळ्या पावाचे तुकडे मोडत,चालून बघा कधीतरी उघड्या पायांनी ,फिरून बघा कधीतरी उघड्या अंगानी...जाणवतील मग त्यांच्या वेदना,त्यांचा त्रास,त्यांचा राग...कळेल मग त्यांचा मत्सर,निर्लज्जपणा,त्यांचा ओंगळपणा...कळेल त्यांचं भिकारीपण!
जगून बघा कधीतरी त्यांच्यासारख जे कधीच जगू शकत नाहीत आपल्यासारखं...मगच दिसतील ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी,मगच सापडतील ते तुम्हाला खऱ्या अर्थाने...

No comments:

Post a Comment