Thursday 16 March 2017

28-05-2013

कधी-कधी असं का वाटतं की काही -काही प्रवास कधी संपूच नयेत? 
डोकं खिडकीला टेकवून आपण नि:शब्द बसलेलो असतो. आजूबाजूला शांतता असते,फक्त कानावर येऊन धडकणाऱ्या वाऱ्याचा मोठ्ठा आवाज असतो. पण त्याचा त्रास होत नाही. संपूर्ण शरीर निश्चल असतं,फक्त केस तेवढे उडत असतात आपल्याच नादात. आणि आपण आपल्याच नादात,कुठेतरी दूरवर डोळे रोखून बसलेलो असतो....जसं काही शोधतोय काहीतरी-कोणालातरी.... 
अचानक वारा आपल्या डोळ्यांवर झडप घालतो. पटकन पापण्या मिटल्या जातात. पण जेव्हा त्या उघडतात तेव्हा आपण कुठेतरी दुसरीकडेच असतो....वारा झेलत,खिडकीला डोकं लावून. आजूबाजूला गप्पा रंगलेल्या असतात.वातावरण उत्साहानी भरलेल असतं. मित्रांचे फक्त आवाज ऐकू येत असतात,शब्द नाही;फक्त चेहरे आठवत असतात,हावभाव नाही. आपण आपले डोळे पुन्हा खिडकीबाहेर नेतो. पुन्हा तसेच कुठेतरी दूर रोखतो....जसं काही शोधतोय काहीतरी-कोणालातरी.... 
मग एक वेगळाच मोठ्ठा आवाज होतो. आपण तंद्रीतून बाहेर येतो. दुसऱ्या प्रवासातून पहिल्या,खऱ्या प्रवासात येतो. गाडीत कुठलस गाणं लागलेलं असतं. आपण गाणं ऐकत नसतो,तरीही ते ऐकू येतच राहतं....हळू-हळू ती धून कानात साठत जाते,आणि आपोआप वाजायला लागते. गाणं बदलतं पण आपलं तिकडे लक्षच नसतं. मनातल्या मनात ती धून गुणगुणत आपण बेभान होऊन,दूरवर डोळे रोखून बघतो....जसं काही शोधतोय काहीतरी-कोणालातरी....पुन्हा तेच.... 
पुन्हा-पुन्हा तेच होत राहतं....गाणं बदललं की प्रवास बदलतो आणि वाऱ्याचा वेग बदलला की विषय बदलतो.... 
कधी-कधी असं का वाटतं की आपण बेभान होऊन प्रवासातच हरवून जावं? 
इतक्यात बाकीच्यांना चहा प्यायची हुक्की येते.गाडी अचानक थांबते. 
तेव्हा असं का वाटतं की काही-काही प्रवास संपूच नयेत...सुरूच राहावेत....कायमचे.... 
असं वाटायला लागलं की उगाच काहीतरी सुचायला लागतं (लोक त्याला philosphy म्हणतात....म्हणेनात!). 
वाटतं,आपल्या आयुष्याचाच असा एखादा प्रवास झाला तर? म्हणजे कुठून निघालोय,कुठ जायचंय हे ठाऊक असावं, जायचा रस्ता बराच लांबचा असावा पण सोबतीला चार-पाच जण जवळचे असावेत....आणि मग त्या प्रवासात इतकं हरवून जावं की जिथे जायचंय ते ठिकाण 'सापडण्यापेक्षा' त्या प्रवासात 'हरवण्याचीच' चटक लागावी. पोहोचण्याच्या आनंदापेक्षा प्रवासाच्या आठवणीच गोड लागाव्यात? 
खरंच,कधी-कधी असं का वाटतं की असे प्रवास कधी संपूच नयेत?....सुरूच राहावेत....कायमचे!

No comments:

Post a Comment