Thursday 16 March 2017

 05-09-2013       

        "कप्पा आवरणं" या गोष्टीबद्दल माझ्या मनात उगाचच कुतूहल आहे...कदाचित प्रत्येकाच्याच मनात असेल. कारण तो प्रत्यक्ष आवरायला लागेपर्यंत कोणाच्याही मनात चुकूनही "चला,खूप पसारा झालाय...आता कप्पा आवरूया" असं येत नाही. उलट ते टाळण्याचीच जास्तीत जास्तं कारणं आपण शोधत असतो. पण एकदा का तो आवरायला घेतला कि मग कुठे थांबणं नसतंच. आजूबाजूला कितीही पसारा वाढला तरी आपण आत-आत शिरतच जातो आणि कोपऱ्यातून उचकून-उचकून वस्तू काढतंच जातो. 
                     आणि मग काहीच्या-काही, म्हणजे वाट्टेल ते निघायला लागतं. रिफील संपलेलं पेन,गुंता झालेला दोरा,तुटलेली पट्टी,बाटलीच बुच....काहीही! खरंतर या वस्तूंचा काहीच उपयोग नसतो, त्या वस्तूच निरर्थक असतात. पण त्या प्रत्येक वस्तु मागची स्टोरी आपल्या डोळ्यासमोर केव्हाच सुरु झालेली असते. 
                    अचानक एखादा नीटशी घडी केलेला कागद मिळतो. तो उलगडल्यावर त्यावर काहीतरी मजकूर लिहिलेला दिसतो. खरंतर तो कागद फाडून फेकून देण्याच्याच लायकीचा असतो.पण तरीपण आपण अलगद घडी करून तो पुन्हा आत ठेऊन देतो.कारण त्या कागदावर त्याच्यावरच्या मजकुरापेक्षा तो लिहिणाऱ्याची आठवण ठळकपणे दिसत असते. अचानक एक पिक्चरचं तिकीट सापडतं. त्याच्यावरून 'त्या' दिवशी घरी उशिरा आल्यावर झालेला 'पिक्चर' आठवतो. कोपऱ्यात पडलेली २-५ रुपयाची नाणी आपण पटकन खिशात टाकतो. 
                     मग आपण seriously कप्पा आवरायला घेतो. आपल्या कप्प्यातली प्रत्येक गोष्टं निरखून पाहिल्याशिवाय आणि ती आपल्याला हवी तशी व्यवस्थित लावल्याशिवाय आपल्या मनाला समाधान मिळत नाही. 
                     इतक्यात, सगळ्यांच्या खाली गेलेला एक शर्ट समोर येतो. मनात विचार येतो-"काही महिन्यांपूर्वी तर हा आपला favourite शर्ट होता आणि आता महिन्यानंतर याची साधी आठवणही न यावी?" 
                    खरंतर, असे अनेक शर्ट असेच कुठेतरी हरवलेले असतात, आपल्याच मनाच्या कप्प्यात. त्यात या मनाच्या कप्प्यात हरवलेला शर्ट सापडणं मुश्किल. रोज येण्याऱ्या 'नवीन' शर्टस च्या नादात, आपल्याला आवडलेले 'जुने शर्ट' कुठे हरवून जातात ,कोण जाणे? 
                     रोजच्या routine सांभाळण्याच्या धावपळीत आपण नकळत सगळ्या गोष्टी अक्षरशः या कप्प्यात कोंबत जातो आणि मागाहून पुन्हा आवरायचही विसरून जातो. "स्वतःचा कप्पा नीट-नेटका,व्यवस्थित ठेव...सगळं जिथून काढलं,तिथेच ठेव"-असं आई नेहमी म्हणते. ते आपल्या कोणाला या जन्मात तरी शक्य होण्याचे chances कमी. पण तिच्यामुळे स्वतःचा कप्पा स्वतः आवरायची सवय लागली -"हेही नसे थोडके!" 
                     स्वतःच्या "मनाचा कप्पा" अगदी व्यवस्थित, नीट-नेटका लावून ठेवणारा माणूस "योगी" होतो. आपण व्यवस्थित नाही ठेऊ शकलो तरी अधून-मधून आवरायची सवय लावली तरी काय बिघडलं? 
                     कप्पा आवरणं खरंतर फार वेळखाऊ काम. त्यासाठी आपल्याला आपल्या "बिझी" schedule मधला "अतिमौल्यवान" वेळ द्यावा लागतो. पण असं असलं तरी तो द्यावाच, कारण आपण त्यात कुठं-कुठं दूरवर फिरून येतो,आठवणीत रंगतो,स्वतःशीच हसतो आणि रीफ्रेश होतो. 
                     आणि कुणास ठाऊक? आपल्याला या क्षणी खूप गरज असलेली एखादी 'गोष्ट' कदाचित आपल्याला आपल्याकडेच सापडेल. अशीच एखाद्या कप्प्यात हरवलेली?.....

No comments:

Post a Comment