Friday 17 March 2017

20-04-2014

नुकताच एका मित्राच्या (हो!मित्राच्याच!) बर्थ डे पार्टीला गेलो होतो. पूर्वी मी वाढदिवसाला वगैरे जायचो. हल्ली असं काही होत नसावं. म्हणजे 'वाढ' वगैरे...पूर्वी वाढदिवसाच्या तारखेपर्यंत काहीतरी 'वाढ' झालेली असणे अपेक्षित होतं. बहुतेक आता सगळ्यांनी आशा सोडून दिल्या असाव्यात.
काही महिन्यांपर्यंत वाढदिवसाची एकच सुरेख कल्पना माझ्या डोक्यात होती. पाहिलं म्हणजे त्या दिवशी झोपेतून लवकर उठावच असा आग्रह नसतो. एरवी अतिशय जोरजोरात ओरडून उठवणारे बाबा,आज अगदीच सौम्य स्वरात-"उठतोयस ना रे? सूर्य केंव्हाचाच उगवला"वगैरे म्हणायला लागतात. आळस देत उठतो न उठतो,तोपर्यंत सकाळच्या गडबडीतपण आईने खास साजूक तुपातला शिरा बनवलेला असतो,त्याचा वास नाकापाशी घुटमळायला लागतो.
आणि मग पटकन tube पेटते!आज आपला वाढदिवस! मग अचानक कुठूनतरी उत्साह आणत एकदम शहाण्या मुलासारखं आवरायला लागतो. उठल्या-उठल्या पांघरुणाची घडी (अगदी टोकाला-टोक जुळवून व्यवस्थित)घालून आपण हळूच स्वयंपाकघरात अंदाज घ्यायला निघतो. स्वयंपाकघरात आई ओट्यापाशी पाठमोरी उभी असते. आपली चाहूल लागताच ती मागे बघते. "जा,आधी तोंड धुवून ये!" असं म्हणण्याऐवजी ती जेंव्हा "झाली का झोप?" असं विचारते, तेंव्हा तर खात्रीच पटते,की आज आपला वाढदिवस आहे.
कढईमध्ये झाकून ठेवलेली आपली आवडती 'छोले' ची भाजी पाहून आपण आपला मोर्चा फ्रीजकडे वळवतो.तिथे अपेक्षितपणे cadbury दिसते.पण लक्ष खाली जाता तेंव्हा अनपेक्षितपणे अख्खाच्या-अख्खा आम्रखंडाचा डबा उभा असलेला दिसतो.
ते पाहून आपण खुशीतच आतमध्ये आवरायला पळतो. मनसोक्तपणे पाण्यात डुंबल्यावर(याला बरेच जण 'अंघोळ' म्हणून ओळखतात!) नवीन कपडे घालण्याची मजा काही औरच! नवीन shirt ,नवीन pant इतकाच काय तर socksही नवीन घालून आपण तयार होऊन बसतो.
आज काय विशेष?सगळं आवरून एकदम तैय्यार?" असं बाबा चिडवण्यासाठी मुद्दामच विचारतात.तितक्यात आई बाहेरून आवाज देते.आसन मांडलेलं असतं.त्याच्यासमोर मस्त रांगोळी काढलेली असते.थाटामाटात औक्षण वगैरे होतं.नमस्कार करून होतो.पण आपलं लक्ष आपल्याला मिळणाऱ्या गिफ्ट कडे लागून असतं.(खरंतर,आपल्यासाठी आई-बाबांनी नवीन digital घड्याळ आणलंय, हे आदल्याच दिवशी आपण गुपचूप पाहून ठेवलेलं असतं)कधी एकदा आपण ते मित्रांना दाखवतो असं होतं!
घर सर केल्यानंतर स्वारी आता शाळा जिंकायला निघते. कपाळावरचा कुंकवाचा टिळा बघून सगळेजण आल्या -आल्याच "happy birthday " म्हणायला लागतात. सगळ्या शाळेचं लक्ष आज फक्त आपल्याकडेच आहे असं वाटून आपण मनोमन सुखावतो. वर्गशिक्षकांसमोर प्रत्येकावर chocolate -गोळ्यांची खैरात होते."chocolates आत्ता खायची नाहीत" असं सांगून वर्गशिक्षक वर्गाबाहेर पडले कि लगेच गोळ्या तोंडात जातात.मधल्या सुट्टीत प्रत्येक शिक्षकाला एक पेन-एक नमस्कार या हिशोबाने स्वतःच्या वाढदिवसाची सूचना केली जाते.एरवी अंगावर खेकसणारे सरसुद्धा जेंव्हा हसत-हसत पेन घेऊन होमवर्कबद्दल न विचारता पाठीवर थाप मारतात,तेंव्हा तिसऱ्यांदा खात्री पटते कि आज आपला वाढदिवस आहेच! डबे लुटले जातात. शाळा सुटल्यावर संध्याकाळी कच्छी-दाबेलीवाल्याच्या गाडीपाशी ५-१० जणांचं टोळकं जमतं."७ मिडीयम और ३ तिखी" अशा ऑर्डरी सुटतात.
घरी पोचल्यावर already आजी,आजोबा,मावशी-काका आलेले असतात.स्वयंपाकघरात पुन्हा काहीतरी बेत शिजत असतो.मावशी-आजीचं औक्षण होतं आणि हातात बंद पाकीट पडतं.ते आपण कप्प्यात सगळ्या कपड्यांच्या खाली नीट जपून ठेवून देतो.
दिवसभर जरा जास्तच हुंदडल्यामुळे आणि भरपेट जेवल्यामुळे डोळ्यांच्या पापण्या जड व्हायला लागतात. आणि बसल्या बसल्या केंव्हा झोप लागते ते कळतही नाही. रात्री बाबांनी हळूच उचलून जागेवर झोपवल्याच आणि नंतर आईनी वरून पांघरुण घातल्याचं थोडंस स्मरणात राहतं.
हल्ली वाढदिवसाची सुरुवात मित्रांच्या फोननी(अजूनपर्यंत तरी मित्रांच्याच,कल किसने देखा हॆ?) होते.केक 'कापला' जात नाही. हल्ली तो 'cut' केला जातो.मग तो अशा हळुवार व कलात्मक पद्धतीने तोंडाला लावला जातो(ज्याला आपण 'फासणे' असेही म्हणू शकतो) की फोटो मध्ये आपण ओळखू येत नाही.आणि त्यामुळे जो त्या फोटोत दिसत नाहीये,त्याचाच वाढदिवस होता असं मानलं जातं.कच्छी दाबेलीची demand आता संपली.त्यात 'मित्रांना' 'मैत्रिणी' मिळाल्यामुळे खिसा फारच हलका व्हायला लागला.फेसबुकवर टाकलेल्या फोटोंना मिळणारे 'लाईक' आजीच्या बंद पाकिटाची उत्सुकता कमी करायला लागले.
पण अजूनही वाढदिवसादिवशी सकाळी शहाण्यासारखा वागण्याचा "लबाडपणा" संपला नाही.आई-बाबांनी आणलेलं गिफ्ट गुपचूप पाहून ठेवण्याचा 'आगाउपणा ' कुठे संपलाय?फ्रीज उघडल्यावर समोर आम्रखंडाचा डबा दिसणं अजूनही surprise च आहे.
आता, या गोष्टींना मी फार मिस करतोय असं काही नाही किंवा हल्ली वाढदिवसाला पूर्वीइतकी मजा येत नाही अशातलाही हा प्रकार नाही. खरं सांगायचं तर उठल्या-उठल्या शिऱ्याचा वास अजूनही नाकापाशी रेंगाळतो. पण फोन्सच्या नादात त्याचा मागोवा घेत स्वयंपाकघरात जाणं राहून जातं. अजूनही दिवस तितक्याच उत्साहात जातो. रात्री झोपताना आईच्या छोलेचीच चव जिभेवर रेंगाळते .फक्त सांगायचं राहून जातं इतकंच...

No comments:

Post a Comment